संपादकीय,
पठाणाच्या प्रचंड व्याजाच्या जबड्यातून कर्जबाजारी होऊ पाहणा-या सभासदांची सुटका करण्यासाठी व वेळप्रसंगी आर्थिक मदत पुरविण्यासाठी १९४५-४६ साली भविष्य काळाचा पूर्ण विचार करून आस्थापनातील १५ व्यक्तींनी मिळून सोसायटीचं हे छोटंसं रोपटं लावलं. आज त्याचा प्रचंड वृक्ष झाला आहे आणि याच वृक्षाच्या सावलीत त्याचा मनसोक्त आनंद घेत आहोत.
"उत्त्पन्नापेक्षा गरजा जास्त” हे व्यस्त समीकरण मानवी जीवनातील एक न उलगडणारे कोडे आहे. आकस्मित ओढवणारे दुर्धर प्रसंग, संकटे, आजारीपणा वगैरे घटना मानवी जीवनात घडत असतात. अशावेळी नितांत गरज असते ती आर्थिक मदतीची. ही गरज थोड्या बहुत प्रमाणात का होईना भागविण्याचे काम सोसायटी करीत आहे. सोसायटीने सभासदांना वेगवेगळ्या प्रकारची कर्जे देऊन त्यांच्या संसारिक जीवनात बहुमोल सहाय्य करतानाच सभासदांना बचतीचे महत्व पटवून दिले आहे. सोसायटी व सभासद यांचे संबंध इतके जिव्हाळ्याचे आहेत की त्यामुळेच सोसायटी, आस्थापनातील एक प्रमुख अंग बनली आहे आणि म्हणूनच "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" हे संयुक्तीक ब्रीदवाक्य असलेल्या ह्या सोसायटीचे सभासदस्यत्व आपल्या आस्थापनाच्या बहुसंख्य कर्मचा-यांनी स्विकारले आहे.