विश्रामगृह

१९४६ साली स्थापना झालेल्या सोसायटीने १९९६ साली सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले. या निमित्त १० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या नाण्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर बरोबर दहा वर्षानी म्हणजे २००६ साली संस्थेचा हीरकमहोत्सव साजरा करण्याचे ठरले, यानिमित्त बोलावलेल्या कार्यकारिणी बैठकीत हीरकमहोत्सवी वर्षात सभासदांना काय भेटवस्तू द्यायची यावर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी असलेल्या श्री. प्रदीप बोरकर यांनी संस्थेचे स्वत:चे विश्रामगृह बांधावे अशी सूचना केली. यावर सर्व सभासदांनी दीर्घ चर्चा करून एखादी भेटवस्तू देण्यापेक्षा सभासदांना अल्पदरात -विश्रामगृहाची सेवा देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

विश्रामगृहाची निर्मिती करण्याकरिता एक समिती गठीत करण्यात आली या समितीने चार-पाच जागा पाहिल्यानंतर लोणावळा येथून ३ कि. मी. अंतरावर, तुंगार्ली येथील गोल्ड व्हॅली निसर्गरम्य परिसरात विश्रामगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता तेथील बांधकाम व्यावसायिक मेसर्स गोका यांच्याशी करार करण्यात आला. या करारानुसार ११ दालनांच्या विश्रामगृहाची निर्मिती झाली. या विश्राम गृहात स्वागत कक्ष, स्वयंपाकगृह आणि छोटेसे गार्डन असून, प्रत्येक दालन उत्तम दर्जाचे फर्निचर, रंगीत दूरदर्शन संच व आवश्यक सुविधांसह युक्त आहे.

३० जानेवारी, २०१० रोजी आस्थापनाचे मानवसंसाधन विभागाचे प्रमुख श्री.राजीव भदौरिया यांच्या हस्ते सदर वास्तूचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप बोरकर अध्यक्ष स्थानी होते. या कार्यक्रमास आस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजाराम सरवणकर यांनी केले. वास्तूचे 'स्वप्नपूर्ती' असे नामकरण देखील करण्यात आले.

या विश्रामगृहास भेट दिलेल्या सर्व सभासदांनी, विश्रामगृहाची निर्मिती करून सभासदांना नाममात्र दरात हक्काचे असे विश्रामगृह उपलब्ध करून दिल्याबद्दल कार्यकारिणीजवळ कृतज्ञता व्यक्त केली.

सभासदांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कार्यकारिणी सदैव ॠणी राहील.