आमच्या विषयी

संपादकीय,

७२ वर्षापूर्वी लावलेल्या ह्या छोट्याशा रोपट्याची जोपासना करण्यासाठी आस्थापनातील अनेकांनी आपल्या जीवनातील महत्वाचा वेळ खर्च केला आहे. त्या सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करणे आपल कर्तव्यच आहे म्हणूनच सोसायटीचे संस्थापकीय सदस्य कै. टी. एन्. देसाई साहेब यांची कायम स्वरुपात आठवण राहावी म्हणून त्यांच्या प्रतिमेची सोसायटीच्या कार्यालयात प्रतिष्ठापनाही केली आहे.

बॉम्बे को-ऑपरेटीव्ह इन्शुरन्स सोसायटी लिमिटेडचे त्यावेळचे प्रमुख अधिक्षक श्री. एन. जी. अवरसरे ह्यांनी २९ ऑक्टोबर १९४९ च्या तिस-या वार्षिक सर्वसाधारण सभेत, आपल्या भाषणाचा शेवट सहकार प्रणालीच्या एका सूचक तत्वाने केला होता. "वन फॉर ऑल अँण्ड ऑल फॉर वन" ह्या वाक्यातील गर्भितार्थ सभासदांशिवाय "सोसायटी” ही संस्था उभीच राहू शकत नाही किंबहुना सभासद आहेत म्हणून सोसायटी आहे, ह्या गोष्टीची जाणीव आम्हाला सातत्याने करून देते.

गरजू सभासदांना कमीत कमी व्याज दराने कर्ज देणे, हा जरी सोसायटीचा मूळ उद्देश असला, तरी त्या बरोबरच, सभासदांना बचत करण्याची सवय लावून, त्यांना बचतीचे महत्व पटवून, वेगवेगळ्या योजनांतर्गत त्यांच्या खाती बचत करण्यासाठीही आम्ही प्रयत्न करीत आहोत. सेव्हींग्ज डिपॉंझिट्स, फेस्टिवल क्युम्युलेटीव्ह डिपॉंझिट्स, कम्पल्सरी क्युम्युलेटीव्ह डिपॉंझिट्स ही त्याचीच उदाहरणे होत.

या महागाईच्या जमान्यात सभासदांकडे बचत म्हणून शिल्लक रहात नाही. उत्पन्न आणि गरजा (खर्च) यांचा सर्वसामान्य माणसांच्या जीवनात कधीच मेळ बसत नाही. कारण गरजा ह्या कधीच संपत नसून नवनव्या रूपाने त्या नेहमीच प्रकट होत असतात. वेगवेगळ्या स्वरूपाच्या कर्ज योजना कार्यान्वित करून सोसायटीने सभासदांच्या निकडीच्या गरजा भागविण्याचे सत्कार्य केले आहे.

आम्हाला सांगण्यास अभिमान व आनंद वाटत आहे की सभासद व सोसायटी यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे व घनिष्ट असून इतक्या लांबच्या कालखंडात असा एकही प्रसंग घडला नाही की ज्यामुळे सभासद व सोसायटी यांच्या मध्ये संघर्ष झाला किंवा सभासदांच्या मुलभूत हक्कांवर कुरघोडी झाली. याचे सर्व श्रेय आजवरच्या कार्यकारिणी सदस्यांना जाते. सोसायटीच्या स्थापनेपासून बी. एस्. ई. एस्. व्यवस्थापनाने व आस्थापनातील सर्व वरिष्ठांनी सर्व त-हेचे सहाय्य केले आहे, ही बाब ह्या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते.

कर्मचारी निवृत सहाय्य निधी, रजत महोत्सव संस्मरण निधी, दीर्घ काळ सभासदस्यत्व बद्दल बक्षिसी सारख्या योजना आखून सोसायटीने सर्व सभासदांमध्ये प्रेम, बंधुभाव व एकोपा जागृत केला आहे. रौप्यमहोत्सव संस्मरण निधी मार्फत पाल्यांना शैक्षणिक पारितोषिक देऊन त्यांच्या गुणवत्तेची प्रशंसा केली आहे. ह्या निधीचा संकल्प सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या दिनी केला गेला आणि आजपर्यंत व पुढेही तो तसाच चालू ठेवण्याचा सोसायटीचा निर्णय राहील.

प्रगतीच्या तक्त्यांकडे नजर टाकल्यास सोसायटीच्या स्थापनेपासून ते २०१२ पर्यंत सभासद संख्या २३ वरून ४९०० पर्यंत पोहोचलेली आहे. पर्यायाने सोसायटीचा कारभार प्रचंड वाढला आहे.

कोणतीही संस्था, सोसायटी अथवा संघटना असो तिचे सर्व वैभव व डामडौल तिचा रणगाडा हाकणा-या कार्यकारिणी मंडळाच्या कार्यक्षमता व कार्यपद्धतीवर अवलंबून असतो. कार्यकारिणी सदस्य जितके प्रामाणिक सचोटीचे व कार्यक्षम असतील तितके त्या संघटनेचे वैभव प्रभावित होत जाईल. आपली सोसायटी याबाबत फारच भाग्यवान आहे. अगदी सुरवातीपासून ते आजपर्यंत सोसायटीचे सर्वच कार्यकारिणी सदस्य, प्रामाणिक व कार्यक्षम आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न बाळगणारे आहेत, ही उल्लेखनीय व प्रशंसनीय बाब आहे. वेळेचे भान न ठेवता सर्वच कार्यकारिणी सदस्य मोठ्या आपुलकीने सोसायटीची व त्या अन्वये सभासदांची सेवा करीत आहेत, याची प्रचिती आपणां सर्वांना जमाखर्चाच्या तक्त्यांवरून दिसून येईलच. सोसायटीच्या संपूर्ण वर्षभराच्या उलाढालीवरून जर खर्चाचे प्रमाण काढले तर फारच नगण्य आहे, हे आजपर्यंत कित्येक जाणकार व्यक्तींनी बोलून दाखवले आहे. सोसायटीच्या सद्याच्या कर्मचारी वर्गानेही कमी वेतनात काम करून सोसायटीचा दैनंदिन कारभार व्यवस्थितपणे सांभाळला आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद!

खरं पहाता "सहकार" या तत्वप्रणालीप्रमाणे, जास्तीत जास्त लाभांश देण्यापेक्षा, कमीत कमी व्याज दराने सभासदांना कर्ज दिले पाहीजे. सोसायटीने या तत्वाची कास धरली आहे. सद्याचा १०.८ ते १२ टक्के हा कर्जावरील व्याजाचा दर बाहेरील जगात सांप्रत असलेल्या व्याज दरापेक्षा फारच कमी असून हा दर गेल्या अनेक वर्षापर्यंत कायम ठेवला आहे आणि त्या बरोबरच महाराष्ट्र सरकारने सोसायटयांच्या कारभाराविषयी जे अधिनियम घालून दिलेले आहेत, तसेच सोसायटीने सभासदांच्या हीताकरिता जे नियम तयार केलेले आहेत, त्यांची आम्ही कधीही पायमल्ली केली नाही. "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" ह्या उक्तीची सोबत सदानकदा उराशी धरून सोसायटीने आजपर्यंत जगलेल्या समृद्ध जीवनापेक्षाही, तिचे भावी जीवन अधिकाधिक तेजोमय राहू द्या व आपणां सर्वांचे बहुमोल सहकार्य असेच मिळू द्या, हीच ह्या समयी प्रार्थना करूया.